अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पत्रकार विभाग, मुंबई
मुक्त तसेच ई वेबसाईट व ई पेपर वर काम करणाऱ्या पत्रकारांना दहा हजार रुपये शासनाने द्यावे - सुभाष देसाई यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी सरकारने मुक्त तसेच ई वेबसाईट व ई पेपर वर काम करणाऱ्या पत्रकारांना दर महिना 10 हजार रुपये पेन्शन स्वरूपात द्यावेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन चे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मुक्त पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर मोठे संकट ओढवले असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पत्रकारीतेचे ज्ञान असूनही त्यांना नोकऱ्या मिळणे कठीण झाल आहे. कायमस्वरूपी नोकऱ्या तर सोडाच पण कंत्राटी पद्धतीच्या नोकऱ्या देखील मिळत नाहीत अशा परिस्थितीत त्यांना मुक्त पत्रकारिता करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सध्या इतर क्षेत्रात नोकऱ्या मिळणे कठीण होऊन बसले आहे. वर्तमानपत्रांना बातम्या तसेच लेख पुरवणाऱ्या या मुक्त पत्रकारांना फक्त शुल्क मानधनावर अवलंबून राहावे लागते. मिळणाऱ्या मानधनावर त्यांचा खर्च तसेच प्रपंच चालवणे कठीण झाले आहे. सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडता फेडता त्यांचे नाकीनऊ आले आहेत. कर्ज काही फीटत नाही पण त्या सावकाराच्या जाचाला ते कंटाळले असून त्यांची मानसिक परिस्थिती ढासळलेली आहे. सरकारला आमची अशी विनंती आहे की, जसे सुशिक्षित बेरोजगारांना चार हजार रुपये बेकार भत्ता दिला जातो. त्याप्रमाणे मुक्त पत्रकारांना देखील दरमहा किमान 10 हजार रुपये पेन्शन स्वरूपात दिले जावेत. यासाठी काही अटी आणि शर्ती असतील तर त्या सरकारने अमलात आणाव्यात. मुक्त पत्रकारांची संख्या अल्प असून त्यांचा हक्क त्यांना दिला जावा अशी आमची मागणी असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. सदर पत्रकार परिषदेमध्ये अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे पत्रकार विभागाचे मुंबई अध्यक्ष रमेश अवताडे, उपाध्यक्ष नंदू घोलप, महासचिव शिरीष वानखेडे, सचिव सुरेश गायकवाड, चिटणीस कल्पेश म्हात्रे, कार्यकारणी सदस्य सुरेश ढेरे तसेच सुबोध शाक्यरत्न आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment