जय जवान जय किसान
अनुभव नसलेल्या संस्थेला आरोग्य विभागातील कंत्राट, नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा डाव, संस्थेविरोधात एमआरए पोलिस ठाण्यात तक्रार दाखल जय जवान जय किसान संस्थेने आणून पाडला डाव मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गोरगरीब दुर्बल जनतेला विविध प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याचे काम करणाऱ्या शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट कागदपत्राद्वारे कंत्राट मिळवणाऱ्या कंपनी विरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात जय जवान जय किसान संस्थेच्या वतीने तक्रार नोंदविण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात संस्थेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये बोलताना संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनातील आरोग्य विभाग फार महत्वपूर्ण समजले जाते. राज्यातील गोरगरीब दुर्बल जनतेला विविध प्रकारच्या आजारावर उपचार देण्याचं काम हे शासकीय रुग्णालय करत असतात. त्याकरिता जिल्ह्यानिहाय जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, मनो रुग्णालय जनतेसाठी खुले आहेत. रुग्णालयातील रुग्णांना उपचार दरम्यान स्तनदा माता व बालकसह रुग्णास नाश्ता, दूध, फळे व दोन वेळा भोजनाची व्यवस्था आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते.
याकरिता आरोग्य विभागाने जिल्हानिहाय रुग्णालयात दैनंदिनी भोजन, दूध, फळे, नाश्ता पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून कंत्राटी तत्त्वावर सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, महिला उत्पादक सहकारी संस्था, बचत गट, बेरोजगार सोसायटी तसेच इतर खाजगी कंपन्या तैनात करण्यात आले आहेत. याकरिता शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये कंत्राटदारांना अदा कले जाते.
ठेकेदारांना आहार सेवेचे काम मिळवण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाच्या नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावे लागते. बहुतांश संस्था
नियमावलीचे पालन करत असतात. परंतु काही संस्था शासनाच्या नियमावलीचे पालन न करता
निविदा मंजूर करून घेतात.
त्यापैकी एक म्हणजे कैलाश फूड किराणा स्टोअर्स 

सदर कंपनीने 2022 मध्ये निविदा क्रमांक CHS/PUR/SEC/NHS/PATIENT SERVICE/PLATE SYSTEM 2021/2022 आहार सेवा निविदा अर्ज दाखल करतेवेळी कैलाश फूड किराणा स्टोअर्स या संस्थेचे संचालक श्री दिलीप म्हेत्रे यांनी
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, सातारा
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, अकोला
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, लातूर
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, पुणे
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, वाशिम येथील कार्यालयातून आहार अनुभवाचे प्रमाणपत्र जोडून टेंडर मिळवले. याची सत्यता पडताळणी करण्यासाठी वरील जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयात अनुभव प्रमाणपत्र विषयी माहिती मागितली असता माहिती अधिकार अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरहू प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध होते. सदर प्रकरणी कैलाश फूड किराणा स्टोअर कंपनीने आरोग्य विभागाचे फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसून येते.
सध्या कैलाश फूड किराणा स्टोअर्स ही कंपनी सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आहार पुरवठा करत आहे. फसवणूक करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचा आशीर्वाद आहे का? आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे किंवा त्यांच्या नातेवाईकाचे कैलाश फूड किराणा स्टोअर कंपनी सोबत भागीदारी आहे का? आरोग्य विभागाद्वारे अशा फसव्या कंपनीला अभय का दिला जातो? अशा 420 कंपनीला काळा यादीत टाकण्यासाठी आरोग्य विभाग तत्परता का दाखवत नाही?, असे कांबळे यांनी सांगितले.
अनुभव नसलेल्या कंपनीद्वारे उपचारार्थ रुग्णांना आहार पुरवठा करण्यात येतो, त्या आहाराची गुणवत्ता दर्जा योग्य असल्याची खात्री आरोग्य विभागाने केली आहे का?
जय जवान जय किसान संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. राजेंद्र कांबळे यांनी आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर, प्रधान सचिव, संचालक, उपसंचालक यांना वरील विषयान्वये लेखी तक्रार दाखल केली आहे.
शिवाय जळगाव येथील संस्थेने सुद्धा कैलाश फूड किराणा स्टोअर्स कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असता, माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक १०/०२/२०२५ रोजी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये कैलाश फूड व किराणा स्टोअर्सचे श्री दिलीप म्हेत्रे, राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था लिमिटेडचे जनार्दन विठ्ठल चांदणे, व यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेच्या श्रीमती संगीता अनिल देशपुते त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 नुसार अनुक्रमे 465, 467, 468, 471, 420, 120 B आणि 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय जवान जय किसान सेवा सेवा संस्थेच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेद्वारे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर विनंती करण्यात येते की, कैलाश फूड किराणा स्टोअर्स या कंपनीचे सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग येथील चालू असलेले टेंडर तात्काळ रद्द करून कैलाश फूड किराणा स्टोअर्स या कंपनीस कायमस्वरूपी ब्लॅक यादीत टाकण्यात यावे.
भविष्यात या कंपनीला आरोग्य विभागासह शासनाच्या कुठल्याही विभागात. निविदा भरण्यास सक्त मनाई करण्यात यावी.
माजी आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांच्या कालावधीमध्ये मंजूर निविदेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या नियमावलीचे पायमल्ली करणाऱ्या आहार पुरवठादार संस्थांचे ऑडिट करून दोषी आढळलेल्या संस्थावर आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर हे कार्यवाही करण्यास तत्परता दाखवतील ही अपेक्षा. शिवाय आहार पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असे राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment