आंबेडकरी आई
आंबेडकरी आई : युगप्रवर्तनाची दाई
----------------------------------
मुंबई : प्रतिनिधी ख्यातनाम विचारवंत प्रा. आशालता कांबळे आणि डॉ. श्यामल गरुड यांनी संपादित केलेला, 42 कर्तबगार मुलींनी त्यांच्या हिकमती आयांबद्दल लिहिलेल्या लेखांचा समावेश असलेला ‘आंबेडकरी आई’ हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ उद्या मुंबईत प्रकाशित होतो आहे. आईवर आजवर जगभर विपुल लिहिले गेले आहे. असंख्य ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. ते मोठ्या प्रमाणावर वाचले गेले आहेत आणि सर्वदूर गाजलेही आहेत. ‘आंबेडकरी आई’ हा त्या सगळ्यांहून वेगळा असा ग्रंथ असून मुलांच्या आयुष्यात आईचा सांस्कृतिक रोल कसा आणि किती महत्त्वाचा ठरतो हे त्यात उत्कटतेने अधोरेखित करण्यात आले आहे. या ग्रंथाच्या निर्मितीमागे धगधगती समाजपरिवर्तनकारी आकांक्षा उभी असल्याने केवळ वेगवेगळ्या आयांचे त्यांच्या मुलींनी आईबद्दलच्या मायेपोटी रेखाटलेले शब्दरूप चित्र-चरित्र असे या ग्रंथाचे स्वरूप न राहता त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताच्या सामाजिक- सांस्कृतिक परिवर्तनाच्या इतिहासामधल्या एका युगप्रवर्तक स्थित्यंतराचा, त्या स्थित्यंतरात आंबेडकरी विचारांनी भारावलेल्या स्त्रियांनी बजावलेल्या अभूतपूर्व कामगिरीचा तो अनोखा लेखाजोखा आहे. एका अर्थाने तो ऐतिहासिक दस्तावेज ठरला आहे.
या ग्रंथात डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. श्यामल गरुड, डॉ. माधवी खरात, डॉ. अपर्णा लांजेवार-बोस, डॉ. सुनीता बोर्डे-खडसे, शिल्पा कांबळे, डॉ. अश्विनी आत्माराम तोरणे, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. सुनंदा बोरकर-जुलमे, शिरीन संजू लोखंडे, विद्या भोरजारे, प्राची प्रेम लोखंडे, प्रा. सिंधू रामटेके, वाल्मिका एलिंजे-अहिरे, प्रा. पूनम छाया किसन गायकवाड, मेघना सुर्वे, सुरेखा पैठणे, मयुरा सावी, प्रा. मीनल वानखेडे, डॉ. मालविका पवार-अहलावत, कुंदा निळे, अस्मिता संजय अभ्यंकर, विनिशा धामणकर, डॉ. सविता सुमेध कांबळे, डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. सुनीता सावरकर, कल्पना कांबळे, करुणा दीपक गायकवाड, छाया रतन बनसोडे, छाया शिंदे, अंजली चंद्रकांत साळवे, सुनीता सत्यभामा (म्हैसकर), वंदना माने-बनसोडे, मधुरिका भगवान किरतकर, डॉ. रेखा मेश्राम, डॉ. मीनाक्षी इंगोले, छाया खोब्रागडे, कमल संजय आढाव, वसुंधरा मधाळे, सोनल बनसोडे, नंदा शरद कांबळे, प्रा. आशालता कांबळे या कर्तृत्त्ववान 42 मुलींनी मनस्वीपणे आपापल्या आईची संघर्षगाथा चितारली आहे. ती वाचताना 1956 ला धर्मांतर केलेल्या समूहावर बौद्ध धम्म स्वीकाराचे जे सकारात्मक पडसाद उमटले, त्यातून धर्मांतरित स्त्रियांच्या मनावर जे खोल परिणाम झाले आणि त्याच्या परिणामी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील या स्त्रियांनी शिक्षणासाठी, मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी जी विजिगीषु भूमिका निभावली, याचे आरस्पानी दर्शन घडते. एका अर्थाने या सर्व लढवय्या स्त्रिया जीवनसंघर्षाच्या रणांगणातील कृतीच्या पातळीवरील दार्शनिक ठरल्या आहेत.
या ग्रंथातील प्रत्येक आई युनिक आहे. प्रत्येकीची संघर्षगाथा इतरांपेक्षा वेगळी आहे. जन्मतः लाभलेली कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी आहे. गरिबीचा, त्यातून तगून राहात निर्धाराने जगण्याचा, समोर आलेल्या परिस्थितीशी झुंज देण्याचा, संकटांशी लढत लढत ध्येयप्राप्तीकडे जाण्याचा आणि या सर्व वाटचालीत विचार करण्याचा स्तर/आवाका वेगळा आहे. आणि तरीही त्यांच्यामध्ये एक मूलभूत साम्य आहे. बुद्ध- फुले- आंबेडकरी निष्ठा हे ते साम्य होय. ही निष्ठा हाच या ग्रंथातील आंबेडकरी आईचा मुख्य प्रेरणास्त्रोत आहे. बुद्ध- फुले- आंबेडकरी विचारधारेला प्रमाण मानल्यामुळे या आया आयुष्यात कधीही हिंमत हारताना, निराश होताना वा नशिबावर हवाला ठेवून ‘आलिया भोगासी असावे सादर’ म्हणत शरणागती पत्करताना दिसत नाहीत. शिक्षणाचे, समतेचे, संघर्षाचे आणि स्वयंप्रज्ञ होण्याचे महत्त्व मनावर बिंबल्यामुळे त्या केवळ टिकूनच राहिल्या नाहीत, तर स्वतःही यशस्वी झाल्या आहेत आणि आपल्या अपत्यांनाही यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. आई असलेली स्त्री कोणत्या वैचारिक- सांस्कृतिक पृष्ठभूमीवर उभी आहे, त्या पृष्ठभूमीतून तिला कोणत्या प्रेरणा मिळतात आणि त्या निर्णायक कशा ठरतात, हे या ग्रंथातून यथार्थपणे सिद्ध झाले आहे.
बुद्ध-फुले-आंबेडकर न स्वीकारतादेखील अनेक स्त्रियांनी स्वतःचे आणि स्वतःच्या मुलाबाळांचे आयुष्य प्रगतीमय केल्याची अनेक उदाहरणे दाखविता येतील. परंतु हे सारे यश त्यांच्या व्यक्तिगत क्षमतेमुळे किंवा त्यांना लाभलेल्या विशिष्ट अनुकूल परिस्थितीमुळे किंवा दोन्हींच्या संयोगामुळे मिळालेले असते, हे विसरून चालत नाही. कोणत्याही समाजात चांगली व्यक्तिगत क्षमता आणि अनुकूल परिस्थिती या बळावर यशस्वी झालेले लोक असतात, पण ते अत्यल्प असतात, अपवाद असतात. ज्यांची चांगली व्यक्तिगत क्षमता नाही किंवा ज्यांच्यापाशी अनुकूल परिस्थिती नाही असे लोक संख्येने नेहमीच जास्त असतात. त्यांनी काय करायचे? त्यांनी जगण्याच्या आणि झुंजण्याच्या प्रेरणा कुठून घ्यायच्या? म्हणून अशा लोकांच्या मनात प्रगतीचे जीवनतत्त्वज्ञान सांगणारी संस्कृती पेरून त्याद्वारे त्यांच्या विचारविश्वात उन्नतीची बीजे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असते. किंबहुना, ती समाजपरिवर्तन करू पाहणार्यांची महत्त्वाची जबाबदारी असते. (धर्मांतराची भूमिका याच जबाबदारीतून येते.) प्रत्येकाच्या मन-मेंदूत बुद्ध रुजवण्याची आणि फुले-आंबेडकर उगवण्याची व्यवस्था केली की त्यातून व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली सांस्कृतिक भूमी आपोआपच आकार घेते. आणि मग स्वाभाविकच उन्नतीची दिशाही त्यातून गवसते. अशा वेळी वैयक्तिक क्षमता कमीजास्त असली तरी चालते. क्षमता कमी असली तरी दिशा उजेडाची असल्यामुळे कमी क्षमतासुद्धा जास्तीतजास्त यश मिळविल्याशिवाय राहात नाही. व्यक्तीचे पायाभूत कल्चर काय आहे, त्यातून उद्भवणारा वैचारिक आग्रह कोणता आहे, यानुसार त्या व्यक्तीच्या जीवनाचा तपशील सुनिश्चित होतो आणि त्यानुरूप यश ठरते. बौद्ध झालेल्या समूहाला हा फायदा जन्मत:च मिळतो. त्यामुळेच एखादा बुद्धिस्ट बाप नसेल फार हुशार, एखादी बौद्ध आई नसेल खूप स्मार्ट, पण तरी तो किंवा ती बुद्धिस्ट असल्यामुळे आपोआपच त्याच्या/तिच्या मनात बुद्धिझमबद्दल आणि फुले- आंबेडकरांबद्दल आपलेपणा निर्माण होतो आणि मग आपोआपच त्यांच्याकडून बुद्ध- फुले- आंबेडकरांनी दिलेले संदेश, केलेले उपदेश, मांडलेले तत्त्वज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न सुरू होतो. या प्रयत्नात उणीवा आणि कमतरता नसतातच असे नाही, परंतु दिशा सुस्पष्ट असते आणि आशय बुद्धिझमला अनुसरणारा असतो. ‘आंबेडकरी आई’ या ग्रंथात हे लख्खपणे दिसते.
या ग्रंथाची पूर्वपीठिका आणि भूमिका सांगताना संपादक प्रा. आशालता कांबळे लिहितात, ‘‘2010 साली जेव्हा ‘आमची आई’ हे माझ्या आईचं चरित्र मी लिहिलं तेव्हापासून ‘आंबेडकरी आई’ ही संकल्पना माझ्या मनात घोळत होती. गावातील देवाच्या भीतीने अत्यंत गरिबी असलेल्या माझ्या वडिलांशी लग्न होऊन, आईचा झापांच्या झोपडीत प्रवेश झाला. याच झोपडीत आम्हा चार भावंडांचा जन्म झाला. आम्हाला कष्ट करून वाढवताना आईने एकालाही वडिलांच्या सोबतीने मजुरीला पाठवलं नाही, तर वडिलांशी संघर्ष करून शाळेत पाठवलं. 1956 साली बुद्ध- फुले- आंबेडकर घराच्या भिंतीवर विराजमान झाले. आंबेडकरी विचार कानी पडत राहिल्याने निरक्षर आईच्या मनात घर करून बसलेली देवांची आणि भूतांचीही भीती पार नाहीशी झाली. विज्ञानवादी विचारांवर तिचा विश्वास बसला. साधारण 50 वर्षाच्या कालावधीत आईने प्रवेश केलेल्या झोपडीचं रूपांतर तिच्या मुलां-नातवंडांनी दोन दोन कार गाड्या असलेल्या बंगल्यात करून दाखवलं. आईच्या नंतरची चौथी पिढी तर आकाशात झेपावून परदेशी जाऊन पोचलीय. 1956 ते 2024 या कालावधीतील हे जे एका कुटुंबाचं स्थित्यंतर आहे ते फक्त आणि फक्त ‘प्रभावती शिवराम कदम’ (आशालता कांबळे यांच्या आई) या निरक्षर आईने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी सांगितलेले बुद्ध मनोमन स्वीकारल्यामुळे! एका स्त्रीने आपल्या हाती असलेल्या घरातील सांस्कृतिक सत्तेचा योग्य वापर केला, योग्य संस्कृती मुलांच्या मनात रुजवली तर वर्षानुवर्षाच्या गुलामीच्या संस्कृतीला ती हद्दपार करू शकते. प्रथम घरातून आणि पर्यायाने समाजातूनही...’’ प्रा. आशालता पुढे लिहितात, ‘‘मी चळवळीत काम करत असताना अनेक कुटुंबात माझ्या आईसारख्या आया पाहिल्या. ‘आमची आई’ लिहिल्यानंतर याही आया साहित्याच्या माध्यमातून जगासमोर यायला हव्यात असं मला प्रकषनि वाटत राहिलं. ‘आंबेडकरी आई’ अशी कितीतरी वर्षे मनात घर करून असतानाच 2022 साली ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे ललिता दोंदे या चळवळीतील आईच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त मी ‘आंबेडकर आई’ या संकल्पनेवर पहिल्यांदा व्याख्यानं दिलं आणि त्याचवेळी ही आई मराठी साहित्यात आणायची हा निश्चय पक्का केला. सगळ्या अडथळ्यांना पार करून समाजात हिंमतीने स्वतःची ओळख निर्माण केलेल्या कर्तबगार मुलींकडून त्यांच्या आयांबद्दल, त्यांनी दिलेल्या आंबेडकरी मूल्यांबद्दल लिहून घ्यायचं ठरवलं. भारतातील पितृप्रधान समाजव्यवस्थेत मुलीच्या प्रगतीकडे दुर्लक्ष केलं जातं. मुलगी जन्मली, वाढली आणि 18 वर्षाची झाली न् झाली तोच तिचं लग्न करून दिलं जातं. पण बाबासाहेबांनी सांगितलं की, मुलींची लग्ने लवकर करू नका. मुलांबरोबरच त्यांनाही शिक्षण द्या. हा संदेश प्रमाण मानून आईपण निभावणार्या स्त्रीने अनेक व्यवधानं सांभाळतानाच आपल्या मुलांबरोबर मुलींच्या प्रगतीकडेही जातीने लक्ष दिलं. तिला हिंमतबाज बनवलं, कर्तबगार बनवलं. आज कितीतरी मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. स्त्रियांचा सहभाग असलेल्या आंबेडकरी चळवळीने पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजात हा बदल घडवून आणला आहे.’’ पुढे त्या लिहितात, ‘‘मी साहित्यक्षेत्रात काम करते, सामाजिक क्षेत्रातही काम करते. परिवर्तनाच्या चळवळीत गेल्या चाळीस वर्षात मी जी काही निरीक्षणे केलीयत, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचा निष्ठेने स्वीकार केलेल्या कुटुंबांची प्रगती झालीय, हे निरीक्षण प्रमुख आहे. अर्थात, बाबासाहेबांच्या विचारांप्रती निष्ठा बाळगणार्या समाजामध्ये पूर्वाश्रमीचा महार समाज, जो आज बौद्ध झालाय तो बहुसंख्येने आहे. यातही कुणी अज्ञानी नाहीत असं नाही. पण जे अज्ञानाने अजूनही पूर्वीच्या गुलामीच्या जीवनात आनंदी आहेत, त्यांची प्रगतीची दारेच बंद आहेत ही वस्तुस्थिती आहे. चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांनी ही दारे उघडण्याचं काम करायला हवं. अशा कामाचाच एक भाग म्हणून ‘आंबेडकरी आई’ या ग्रंथनिर्मितीचं कामं आम्ही हाती घेतलं.’’
‘आंबेडकरी आई’ ही संकल्पना स्पष्ट करताना प्रा. आशालता कांबळे म्हणतात, ‘‘आंबेडकरी तत्त्वज्ञान स्वीकारणारी आणि आपल्या मुलांना त्या मार्गावरून चालण्याची शिकवण देणारी आई ही ‘आंबेडकरी आई’ होय. ही आई कोणत्याही जाती-धर्म- समूहातील असू शकते. पहिल्या पिढीत आंबेडकरी तत्त्वज्ञान स्वीकारणारी पूर्वाश्रमीच्या महार सोडून इतर कुठल्याही जातीतील स्त्री सहसा दिसत नसली तरी दुसर्या, तिसर्या आणि आताच्या चौथ्या पिढीत हे तत्त्वज्ञान स्वीकारणार्या इतर जाती-धर्मातील कितीतरी स्त्रिया दिसताहेत. याही ग्रंथामध्ये बौद्ध समुदायाबरोबरच चर्मकार, मराठा आणि ओबीसी समूहातील स्त्रिया आहेत, ज्यांना आईने किंवा आईसमान सासूने आंबेडकरी संस्कार देऊन घडविलेले आहे. ’’
कुठल्याही समाजाच्या मूल्याधिष्ठित सांस्कृतिक स्थित्यंतराच्या तळाशी त्या त्या समाजातील स्त्री शिरोभागी उभी असते, हे महत्त्वाचे निरीक्षण नोंदविताना या ग्रंथाच्या दुसर्या संपादक डॉ. श्यामल गरुड यांनी ‘आंबेडकरी आई’ साकारण्यात 1956 साली झालेल्या धर्मांतराचे काय स्थान आहे हे अचूकपणे अधोरेखित केले आहे. त्या लिहितात, ‘‘ब्राह्मणी धर्मशास्त्रांनी जातीचे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व हे जैविकतेशी जोडून सांस्कृतिक राजकारण उभे केले. त्यात नीतिमूल्यांच्या तटबंद्या स्त्रियांभोवती अधिक घट्ट उभ्या करून योनिशुचिता, वंशशुद्धी जपण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकीत, तिची लैंगिकता नियंत्रित करीत पातिव्रत्याचे श्रेष्ठत्व तिला पटवून दिले. ब्राह्मणी पितृसत्तेचे वर्चस्व आणि सर्वच जातीतल्या स्त्रियांभोवतीचा पितृसत्तेचा काच कसा अबाधित राहील याची काटेकोर तजवीज केली. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धर्मांतर करून हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्यव्यवस्थेला मोठा हादरा देत मानवतावादी बौद्ध धम्म स्वीकारून अस्पृश्यांना आत्मसन्मानाचा मार्ग मोकळा करून दिला. भारतीय इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरली. ज्यातून विशेषत: पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य स्त्रियांना कर्मठ रुढी-प्रथांपासून मुक्ती मिळाली. या धर्मांतरित आईने देव्हारे, रुढी, परंपरांना नाकारीत डॉ. आंबेडकरांच्या ‘शिका’ या पहिल्या मूलमंत्राशी प्रामाणिक राहून अत्यंत हलाखीतही आपल्या मुलांना शिकविले.’’
‘आंबेडकरी आई’ या संकल्पनेत नक्की काय अभिप्रेत आहे हे डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी त्यांच्या लेखात नेमक्या शब्दात मांडले आहे. त्या लिहितात, ‘‘आंबेडकरवादाला अनुसरणारी, स्वतःच्या जीवनपटावरची वाटचाल त्या प्रारूपान्वये करणारी, तत्त्व आणि व्यवहार यात फारकत न करणारी कोणतीही आई ‘आंबेडकरी आई’ या संज्ञेस पात्र होऊ शकते. मग ती कोणत्याही जात- वर्ग- धर्माची ओळख सांगणारी असो. मात्र तिचा गाभा समतावादी असायला हवा. मुदिता, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठ जाणिवांचा संकर तिच्यात मौजूद असायला हवा. दैववादी, प्रारब्धवादी रचितांना तिने नकार द्यायला हवा. आधुनिकतेचा पुनरुच्चार करताना मेत्ताभाव, विवेकवाद आणि प्रबुद्ध होण्यापर्यंत तिच्या दृष्टीचा पट विस्तारलेला असायला हवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना घडवताना तिने या क्रांतदर्शी अन्वेषक भूमिका जाणतेपणाने त्यांच्या कोवळ्या वयात रुजवायला हव्यात.’’
डॉ. प्रज्ञा दया पवारांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा संपादकांना ‘आंबेडकरी आई’चा जो अर्थ अभिप्रेत आहे त्यानुसार अगदी यथार्थ आहे. मात्र या अपेक्षेच्या पूर्ततेच्या संदर्भात डॉ. प्रज्ञा यांनी काही मर्यादाही दाखवून दिल्या आहेत. त्या म्हणतात- " 'आंबेडकरी आई’ या संज्ञेप्रत जाणार्या स्त्रीचं वर्णन अतिशय आदर्श आहे. सर्वोत्तम गुणांची मागणी करणारं आहे. क्वचित तिचं मानवीपण नाकारणारं आहे. ती एक जिवंत अशी हाडामांसाची स्त्री आहे, तिच्यातही काही व्यत्यास, अंतर्विरोध असू शकतात हे नाकारणारं आहे. तिच्यावर काहीसा अन्याय करणारंही आहे. म्हणूनच या पुस्तकात चित्रित झालेली कुठलीही आई ही शंभर टक्के ‘आंबेडकरी आई’ आहे हे गृहीतक आपण जरा विवेकानेच तपासून घ्यायला हवं असं मला वाटतं. कोणत्याही व्यक्तीमध्ये पांढर्या-करड्या रंगांच्या शेड्स असतात. या रंगछटाच त्या त्या व्यक्तीला माणूस बनवत असतात. त्याचं प्रमाण कमी-अधिक असू शकतं आणि त्याची कारणे देखील सामाजिक, सांस्कृतिक वास्तवात दडलेली असतात. या पुस्तकात नसलेल्या कितीतरी आया माझ्यासमोर येत राहतात. त्या त्यांच्या मुलांना कसं घडवत असतील ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना ज्ञात असतील का ? त्यांच्या रोजमर्राच्या हाता-तोंडाशी गाठ घालण्याच्या विवंचनेत त्या त्यांच्या कच्च्याबच्च्यांना कोणते धडे देत असतील ? असे अनेक प्रश्न मला छळताहेत आणि त्यातली गुंतागुंत नजरेआड करता येत नाही."
डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी ‘आंबेडकरी आई’ या गृहीतकाच्या दाखवून दिलेल्या या मर्यादा 'मानवी' आहेत आणि त्यामुळे महत्त्वाच्या आहेत यात शंकाच नाही. परंतु त्यामुळे नकळतपणे ‘आंबेडकरी आई’ या संज्ञेत एक फट निर्माण होते आणि आपसुकपणे असे वाटायला लागते की, ‘आंबेडकरी आई’ असणे किंवा होणे अगदीच आवश्यक आहे असे नाही. ‘आंबेडकरी आई’ जे काम करते तेच काम पुरेशा प्रमाणात जाणीवजागृत झालेली अन्य कोणतीही स्त्री करू शकते. असे वाटणे हे ‘आंबेडकरी आई’ बनण्याच्या आवश्यकतेपासून दूर जाण्यासाठी पळवाट ठरू शकते आणि त्यामुळे ही फट तातडीने बुजविणे गरजेचे आहे असे मला वाटते. ‘आंबेडकरी आई’ या संज्ञेत अभिप्रेत असलेल्या आदर्शाबरहुकूम (किंवा अन्य कोणत्याही आदर्शाबरहुकूम) तंतोतंत वर्तन करणे अत्यंत अवघड असते, किंबहुना अशक्यप्राय असते, तशी अपेक्षा करणे हे 'आंबेडकरी आई' बनू पाहणार्या स्त्रीच्या ‘माणूस’पणावर अन्याय करण्यासारखे होईल, हा त्यांच्या विवेचनाचा सारांश मान्य करावा असाच आहे. परंतु माझ्या मते खरा प्रश्न शंभर टक्के आदर्शपालनाचा नसून अधिकाधिक आदर्शपालनाचा आहे आणि त्यासाठी मुळात अधिकाधिक चांगला आदर्श स्वीकारण्याचा आहे. इथे ‘अधिकाधिक’ हा शब्द महत्त्वाचा आहे. गणितात किंवा सायन्समध्ये शंभर टक्के मार्क्स मिळतात. मराठीत किंवा तत्सम (सांस्कृतिक) विषयात शंभर टक्के मार्क्स मिळत नाहीत. पेपर शंभर मार्कांचा असला तरी विद्यार्थ्याला शंभर मार्क्स मिळाले तरच तो उत्तीर्ण, असे जगाच्या पाठीवर कुठेही मानले जात नाही. शंभर टक्के मार्क्स मिळविणे हे विद्यार्थ्यांचे ध्येय असले तरी त्या ध्येयाला त्यांच्या व्यक्तिगत क्षमतांची आणि अंतर्विरोधांची मर्यादा असतेच. त्यामुळेच त्यांना शंभर टक्के मार्क्स मिळत नाहीत आणि तरीही आपण त्यांचे कौतुक करतो. याच धर्तीवर ‘शंभर टक्के आंबेडकरी आई’ ही फारशी अस्तित्त्वात असणार नाही हे मान्य केले तरी ‘अधिकाधिक आंबेडकरी आई’ बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेच लागतील आणि त्याच दृष्टीने तिच्या यशाकडे पाहावे लागेल. हे पाहताना मुदलात तिच्या ‘आंबेडकरी’ असण्यात बुद्धापासून फुले-आंबेडकरांपर्यंतची संपूर्ण प्रागतिक परंपरा समग्रपणे एकवटलेली आहे आणि त्यामुळे आंबेडकरी आई सांस्कृतिकदृष्ट्या भरकटण्याची शक्यता संपुष्टात आलेली आहे, हे ध्यानात घ्यावे लागेल.
याच अनुषंगाने इथे आणखी खोलात जाऊन मानवी समाजाची एक मूलगामी गरज अधोरेखित केली पाहिजे. ती म्हणजे, वर म्हटल्याप्रमाणे मुळात प्रत्येक माणसाला उच्चतम आदर्श असला पाहिजे आणि तो त्याला त्याच्या जीवननिष्ठेचा अविभाज्य भाग वाटला पाहिजे. (समोर पेपर 100 मार्कांचा असेल तर अधिकाधिक अभ्यास करून त्यात 70, 80, 90 असे काहीतरी मार्क्स मिळतील. पण मुळात समोर पेपरच नसेल तर ? इथे पेपर = आदर्श) बारकाईने पाहिल्यास हे दिसते की, धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारलेल्या समूहाकडे उच्चतम आदर्श आणि त्या आदर्शाप्रतीची अविभाज्य-अभंग निष्ठा आहे. याउलट, बौद्घेतर समूहाकडे प्रागतिक आशयाचा ठोस सांस्कृतिक आदर्शच नाही. (या पोकळीच्या परिणामीच बाबा-बुवांचे आश्रम आणि शिर्डी-अक्कलकोटची देवस्थानं भरभरून गर्दीने बारा महिने ओसंडून वाहात असतात!) इथे एक कटू निरीक्षण नोंदवायला हवे ते म्हणजे, बौद्ध नसलेले अपवादात्मक लोक फक्त वैचारिकदृष्ट्या पुढारलेले आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या ते मागासलेलेच आहेत. वैचारिक आदर्श आणि सांस्कृतिक आदर्श यात मोठा फरक असतो, हे नीट लक्षात घेतले पाहिजे. वैचारिक आदर्श सहसा आणि शक्यतो वैचारिक पातळीवरच फॉलो केला जातो. तो जीवनव्यापी क्वचितच होतो. सांस्कृतिक आदर्श हा मुळातच जीवनव्यापी असतो. माणसाला तो सर्वांगांनी घेरतो. आज बौद्ध समाज बुद्धिझमरुपी सांस्कृतिक आदर्शाने चहुबाजूंनी घेरला गेला आहे. त्यातूनच आणि त्यानुसारच त्याच्या जाणिवा/नेणिवा विकसित झाल्या आहेत. त्यामुळे तो समतेच्या आणि विज्ञानवादाच्या कोणत्याही चळवळीला पाठिंबाच देतो. आंबेडकरी माणूस समता प्रस्थापनाच्या/अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी असणारच, निदान विरोधात नसणार, हे डोळे झाकून गृहीत धरले जाते. इहवादी विचार आणि बुद्ध-फुले-आंबेडकर हे त्याच्या जीवननिष्ठेत मिसळलेले असतात. या महामानवांच्या नावांच्या उच्चारासरशी त्याच्या हृदयाची स्पंदने वेगवान होतात. बौद्धेतर समाजात अशा वैचारिक/सांस्कृतिक निष्ठेचा आणि स्पंदनांचा अभाव आहे. आंबेडकरी समाजात आणि आंबेडकरी आईजवळ अशी धडधडणारी स्पंदने आहेत. म्हणूनच शंभर टक्के यश मिळाले नाही तरी ‘आंबेडकरी आई’ होणे अत्यावश्यकच ठरते.
याच संदर्भात एक प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे, दैनंदिन जीवनात येणार्या संकटांशी दोन हात करणारी, त्यातून आपला संसार नेटाने चालविणारी, आपल्या मुलामुलींना त्यांच्या आयुष्यात सक्षमपणे उभं करणारी आई तर सर्वत्रच दिसते. ती काही एकट्या आंबेडकरी समाजातच आढळते, अशी स्थिती नाही. मग या ग्रंथातील आयांचे वेगळेपण काय आहे ? ‘आंबेडकरी आई’ या संज्ञेत इतर आयांच्या तुलनेत कोणता ‘अधिकचा मात्रा’ (प्लस पॉईंट) आहे ?
आंबेडकरी आयांना त्यांच्या अंतर्यामी ऐकू येणार्या सांस्कृतिक हाका, हा तो अधिकचा मात्रा होय. हा अधिकचा मात्रा हेच त्यांचे इतर सर्व आयांहून असलेले निर्विवाद वेगळेपण आहे. आणि हाच या पुस्तकाचा मध्यवर्ती मुद्दा आहे.
या पुस्तकाचा हेतू ‘आई’ या भूमिकेचे भावनिक उदात्तीकरण करणे हा नाही. आंबेडकरी आईच्या अंतर्मनात कोणते सांस्कृतिक विश्व तरळत असते आणि त्यानुसार तिच्या जगण्याची ऊर्मी स्वातंत्र्य-समतेच्या आणि विवेकवादाच्या बाजूने कशी उसळत राहते हे सप्रमाण सिद्ध करणे हा प्रमुख उद्देश आहे. या पुस्तकाची दखल घेणार्या प्रत्येकाने या उद्देशावर फोकस केला पाहिजे. तसे झाले नाही आणि फक्त ‘आई कशी श्रेष्ठ असते’ या पारंपरिक पितृसत्ताक पालुपदावरच चर्चा होत राहिली तर प्रस्तुत पुस्तकाचा मुख्य मुद्दा हरवल्यासारखे होईल. जागरूक आंबेडकरी वाचकांची संख्या लक्षात घेता तसे होणार नाही याची खात्री वाटते. पुरोगामी विश्वातील बौद्ध नसलेल्या वाचकांबद्दल मात्र तशी खात्री देता येत नाही. कारण त्यांना हा विषयच चर्चिला जाणार नाही याची काळजी घ्यायची असते. त्यांना फक्त आंबेडकरांचे नाव उच्चारायचे असते आणि आंबेडकरांनी आंबेडकरी समूहात रुजविलेल्या सांस्कृतिक अधिष्ठानाकडे सोयीस्कर डोळेझाक करायची असते. तसे वागून ते भारतीय भूमीतील एका यशस्वी प्रयोगाच्या विस्तारात अडथळा आणतात आणि एक प्रकारे प्रतिक्रांतीला सहकार्य करतात. अर्थात, कळतपणे वा नकळतपणे त्यांच्याकडून घेतला जाणारा हा क्रांतिविरोधी पवित्रा आज ना उद्या त्यांच्या लक्षात येईल आणि ते आंबेडकरी क्रांतीत उत्साहाने सहभागी होतील, हा आशावाद बाळगायला हरकत नाही.
एका युगप्रवर्तनाचे कुशल दाईत्व केलेल्या ४२ आंबेडकरी आयांचा शोध घेऊन त्यांच्या माध्यमातून घडून आलेल्या क्रांतीला संपादित ग्रंथाद्वारे उजेडात आणल्याबद्दल प्रा. आशालता कांबळे, डॉ. श्यामल गरुड या संपादकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी खरोखरच अभूतपूर्व काम केले आहे. त्यांना सहकार्य करणार्या सुरेखा पैठणे, नंदा कांबळे, छाया बनसोडे, शैलेश दोंदे, गौतम सांगळे, शरद कांबळे तसेच प्रकाशक देवेंद्र उबाळे आणि मुखपृष्ठकार बुद्धभूषण साळवे यांचेही अभिनंदन! सर्वच आयांच्या चेहर्यावरील भाव बारकाव्यांनिशी टिपणारी, बोलकी आणि तितकीच कलात्मक रेखाटने करणारे प्रणेश वालावलकर यांचे विशेष अभिनंदन! त्यांच्या रेखाटनांमुळे या ग्रंथाला व्यक्तिचित्रणात्मक लालित्याचा सुंदर साज चढला आहे.
या ग्रंथाचा चौफेर प्रसार होवो आणि घराघरात आंबेडकरी आई उदयाला येवो, ही सदिच्छा !
@ संदीप सारंग
-------------------------------------
प्रकाशक -
डॉ. आंबेडकर वाड्.मयीन अभ्यास मंडळ
इगतपुरी, जिल्हा : नाशिक
मोबाईल : 9422945943
ग्रंथासाठी संपर्क -
गौतम सांगळे, मुंबई
मोबाईल - 9324454668
Comments
Post a Comment