mantralya news

नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर? विधानसभेची मुदत संपल्यास राष्ट्रपती राजवट लागणार की नाही? सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट 

मुंबई :  विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला घसघशीत बहुमत मिळालं. त्यानंतर आज किंवा उद्याच शपथविधी होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु तूर्तास सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २७ ते २९ नोव्हेंबरच्या दरम्यान शपथविधी सोहळा होण्याचे संकेत मिळत आहेत.

सध्याच्या विधानसभेची मुदत २६ तारखेला संपत असली, तरी नव्या सरकारचा शपथविधी त्याआधीच झाला पाहिजे, असे बंधनकारक नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाधिवक्त्यांचीही राज्यपालांसोबत काल या विषयावर बैठक झाली. यापूर्वीही निकालाच्या दीर्घ कालावधीनंतर शपथविधी आणि सत्तास्थापना झालेली आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवीन सत्ता स्थापना न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याचा समजही चुकीचा असल्याची माहिती मिळत आहे. इकडे, महायुतीला पूर्ण बहुमत मिळालेले असल्यामुळे कुठलीही धाकधूक नाही. त्यामुळे घाई न करता व्यवस्थित निर्णय घेण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची दिल्लीत संयुक्त बैठक होईल. या बैठकीत पुढील चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची निवड होईल. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिघा प्रमुख नेत्यांचा त्यानुसार शपथविधी होईल. बुधवार २७ ते शुक्रवार २९ नोव्हेंबर या तारखांच्या दरम्यान शपथविधी होण्याचे संकेत मिळत आहेत. उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नंतर होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलेला आहे. २१-१२-१० अशी मंत्रिपदांची विभागणी केली जाऊ शकते. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सर्वाधिक म्हणजे २१ मंत्रिपदे मिळण्याचे संकेत आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर यश मिळालं आहे. भाजपला १३२, शिवसेनेला ५७, तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय भाजपच्या मित्रपक्षांना पाच, तर शिंदेंच्या मित्रपक्षांना एका जागेवर यश मिळालं आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वाट्याला एकूण मिळूनच ४६ जागा आल्या आहेत. काँग्रेसला १६, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना १० जागा, तर शिवसेना (ठाकरे गट) २० जागा मिळाल्या आहेत.



Comments

Popular posts from this blog

Transport News

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Mr. Vasudev Gaiyonde press कॉन्फरन्स