manse mankhurd
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेत मनसेचा उमेदवारी अर्ज दिमाखात दाखल
मुंबई - मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मनसे उमेदवार जगदीश खांडेकर यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी, हितचिंतक यांच्या उपस्थित भव्य रॅली काढत आपला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईची ही विधानसभा यावेळी जरा जास्तच चर्चेत आहे. मुस्लिम बहुल असलेल्या मतदारसंघात दोन तगडे मुस्लिम नेते समोरासमोर येणार आहेत अशातच मनसेने देखील इथे उमेदवार दिल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार व समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी तसेच माजी मंत्री नवाब मलिक यांच्यात घमासानाची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. मतदारसंघाचा पूर्व निवडणुकीचा इतिहास पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्याने इतर मुस्लिम पक्ष तसेच स्थानिक समाजसेवक हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असतात अशातच मनसेची उमेदवारी जाहीर होताच मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेने मनसेची स्पर्धेत संभाव्य विजयी अशी प्रतिमा आपोआप झाली आहे. मनसेने येथून उमेदवार चाचपणी करून अखेर माळ आपल्या स्थानिक पदाधिकारी विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या गळ्यात टाकली आहे. एक आंदोलक कार्यकर्ता अशी ओळख असलेले जगदीश खांडेकर यांच्या उमेदवारीने मतदारसंघातील पश्चिम महाराष्ट्रातील मतदार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंदू जननायक प्रतिमेमुळे इतर हिंदू धर्मीय यांचा वाढता पाठिंबा जगदीश खांडेकर यांना मिळत आहे. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मनसेने यापूर्वी देखील उमेदवार उतरत आश्चर्यकारक मते मिळवली होती. जगदीश खांडेकर यांनी अनेक सामाजिक आंदोलने केली आहेत. पक्षाचे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत असल्यामुळे त्यांची नागरिकांशी बांधिलकी घट्ट आहे.
दुसरीकडे गेली १५ वर्ष मतदारसंघात एकाधिकारशाही असलेल्या महविकास आघाडीचे अबू आझमी यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही. लोकसभेनंतर अबू आझमी यांच्याविषयी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांत जाहीर नाराजी उघड दिसत आहे. दुसरे आपला बालेकिल्ला सोडून या मतदारसंघात राजकीय नशीब पणाला लावलेल्या माजी मंत्री नवाब मलिक यांना अद्याप महायुती कडून ताटकळत ठेवण्यात आले आहे. परंतु, मतदारसंघातील स्थानिक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी तसेच स्थानिक समाजसेवक, संघटना यांच्या प्रतिसादामुळे नवाब मलिक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची देखील शक्यता नाकारता येत नाही. नवाब मलिक यांना दीर्घ राजकीय अनुभव असल्याने या मतदारसंघातील उमेदवारी पाठी त्यांची काही राजकीय गणिते निश्चित असणार. तसेच एमआयएम कडून देखील सामजिक कार्यकर्ते अतीक अहमद तसेच इतर अपक्ष अजून सपर्धेत राहणार आहेत.
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा झोपडपट्टी बहुल असल्याने या मतदारसंघात अनेक वर्षापासून समस्या "जैसे थे" अशा परिस्थितीत आहेत. प्रामुख्याने प्रदूषित गोवंडी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाला प्रदूषण मुक्त करणे हे येथील प्रत्येक लोकप्रतिनिधीला आद्यकर्तव्य समजावे लागणार आहे. गोवंडी कचरा डेपो तसेच एसएमएस कंपनी यांच्यामुळे दिवसेंदिवस स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका ठरत असल्याचे अनेक अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या पर्यावरण इतिहासात इथल्या "प्रदूषणविरोधी" मोर्चे आंदोलनांनी काळा इतिहास नोंदवला आहे. तसेच दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवैध नशा व्यवसायाची "राजधानी" अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाला "नशामुक्त" करणे हा देखील सामाजिक प्रश्न लोकप्रतिनिधींना अग्रक्रमाने सोडवावा लागणार आहे. विशेष म्हणजे मागील ईशान्य मुंबईची लोकसभा निवडणूक ही प्रामुख्याने नशेच्या मुद्द्यावर भाजपाकडून लढवली गेली होती. मागील काही महिन्यात गोवंडीत नशा व्यवसायातून तसेच नशाखोरीतून "खून" सारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनी नशाखोरी विरुद्ध उग्र आंदोलने देखील केले आहेत. अनेक समाजसेवक या नशा खोरी विरुद्ध आपापल्या परीने निदर्शने आंदोलने नेहमीच करत असतात परंतु याला एक प्रखर राजकीय पाठबळाची गरज भासणार आहे. या दीर्घ समस्याबाबत नागरिक मनसेकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत. या प्रमुख समस्यांसह स्थानिक नागरिकांच्या वैद्यकीय,शैक्षणिक अशा प्रलंबित आव्हानांना देखील मनसेला भविष्यात सामोरे जावे लागणार आहे.
Comments
Post a Comment