sachin Basre
कल्याण पश्चिममध्ये ठाकरेसेनेच्या
सचिन बासरे यांचे शक्तिप्रदर्शन
कल्याण, दि. २९ ( प्रतिनिधी)- कल्याण पश्चिममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत सचिन बासरे यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
सचिन बासरे यांच्या शक्तिप्रदर्शनावेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार प्रियांका चर्तुर्वेदी, शिवसेना उपनेते अल्ताफभाई शेख, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रवक्ते महेश तपासे, माजी नगरसेविका समिधा बासरे, उपशहरप्रमुख दिनेश शेट्टे उपस्थित होते. कल्याणचे शहरप्रमुख असणाऱ्या सचिन बासरे यांना ठाकरेंनी कल्याण पश्चिमधून उमेदवारी दिल्यामुळे येथील लढत आता रंगतदार होणार आहे. विद्यमान आमदार आणि एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधातील नाराजीचा फायदा बासरे यांना मिळू शकतो. विश्वनाथ भोईर यांनी उमेदवारी दिल्यामुळे महायुतीतील भाजपाचे निष्ठावंत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बंड पुकारले आहे. त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यामुळे भोईर यांना हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. मनसेतर्फे उल्हास भोईर यांनी येथे उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे येथील लढत चौरंगी होणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत कल्याण पश्चिममधून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामांना मताधिक्य मिळवून देण्यात सचिन बासरे यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बासरे यांना असलेला पाठींबा या मतदारसंघात निर्णायक ठरू शकतो. याउलट भाजपा बंडखोर उमेदवाराचे बंड थंड करण्याचे पहिले आव्हान विश्वनाथ भोईर यांच्यासमोर असेल.
फोटो
Comments
Post a Comment